पवार-शाह गुप्त भेट : जितेंद्र आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अमित शाहांसोबत गुप्त भेट झाल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आव्हाड म्हणाले की, शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जिवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहे. मग त्यात कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील उडिसामधले विजू पटनाईक असो बंगालमधील जोती बसू असोत. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिले आहेत. महाराष्ट्रात देखील प्रमोद महाजन हे त्यांचे अत्यंत जवळचे होते. त्यामुळे संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आला आहे. पण राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो तो फक्त वैचारिक विरोधक असतो असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान अंबानी स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन यांची हत्या, सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांचे लेटर बॉम्ब, फोन टॅपिंग आदी विविध प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतल्याच्या चर्चेनंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. अशावेळी शिवसेनेकडून कोणती भूमिका घेतली जातेय ते पहावे लागणार आहे.