साहेब, ‘त्यांच्याएवढा अन्याय आमच्यावरही करा…’

पवारांनी डागली मोहिते पाटलांवर तोफ

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – मला आता राज्यभरातून लोकांचे मेसेजेस येत आहेत की, ‘त्यांच्याएवढा अन्याय आमच्यावरही करा’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना टोला लगावला आहे. शरद पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी आपली तोफ विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर डागली. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना मोहिते पाटील यांना आजवर कोणकोणती पदे दिली याचा पाढाही पवार यांनी पत्रकारांना वाचून दाखवला.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना बारामतीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. तेव्हा त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, “विजयसिंह मोहिते पाटील आणि मी काँग्रेसमध्ये एकत्र होतो. आम्ही राष्ट्रावादीत एकत्र काम केले. आम्ही नेहमीच सहकाऱ्यांना सन्मान देतो. मला आता राज्यभरातून लोकांचे मेसेजेस येत आहेत की, त्यांच्याएवढा अन्याय आमच्यावरही करा.” असा खोचक टोला पवारांनी मोहिते पाटील यांना लगावला.

‘पंरतु त्यांच्या मनात मात्र काही वेगळाच विचार आला’

पुढे बोलताना पवार म्हणाले की, “मला विचारलं जातं की, तुम्ही इतकी वर्षे मंत्रीपद दिले, उपमुख्यमंत्रीपद दिले, इतकेच नाही तर त्यांना लोकसभेला संधी दिली, इतकी वर्षे आमदारकी दिली. देशाच्या साखर संघावर घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या साखर संघाचे अध्यक्ष केले. परंतु हे सर्व निर्णय मी जाणीवपूर्वक आणि प्रोत्साहित करण्यासाठी घेतले.” असे पवार यांनी स्पष्ट केले. याशिवाय पवार असेही म्हणाले की, “आमच्या मनात दुसरी काही भावना नव्हती. परंतु, आम्हाला इतकीच अपेक्षा होती की, आपण लोकांशी बांधिलकी ठेवावी. त्यांच्या मनात मात्र, काही वेगळाच विचार आला. त्यात त्यांनी निर्णय घेतला.”

‘बहुसंख्य कार्यकर्ते आणि मतदार हे संजय शिंदे यांना ताकदीने मदत करतील’

यावेळी पत्रकारांनी पवार यांना प्रश्न विचारला की, मोहिते पाटील यांच्यावर तुम्ही काही कारवाई करणार का ? तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, “आम्हाल स्वच्छपणे निवडणूकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. त्यांनी ज्यांच्यासाठी तिकीट मागितले आहे, त्यांच्यासाठी त्यांनी पक्ष सोडलेला आहे. पक्ष सोडण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा राजकीय निर्णय आहे. त्यावर मला काही भाष्य करायचे नाही.” याशिवाय, “मला खात्री आहे की, या मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि मतदार हे संजय शिंदे यांना ताकदीने मदत करतील” असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.