पवारांची खेळी : सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘यांचे’ नाव चर्चेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन राजकीय खेळी करीत लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आणले आहे. आज रात्री मुंबईत आमदार जगताप पिता-पुत्रांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा झाली. त्यात आमदार जगताप यांना उमेदवारी देणार असे सांगण्यात आले आहे, असे सूत्रांकडून समजते.

राष्ट्रवादीने आमदार जगताप यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची मोठी गोची होणार आहे. विखे यांच्या प्रवेशावेळी मुंबई असलेले आमदार कर्डिले हे पक्षाचा प्रचार करणार की व्याहीची साथ देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पवार यांनी आमदार जगताप यांची उमेदवारी पुढे करून कर्डिले यांची कोंडी केल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.

आमदार जगताप पिता-पुत्र मुंबईत दाखल झाले असून पक्षाचे राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत त्यांची बैठक झाल्याचे समजते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला प्रभावी उमेदवार मिळत नसल्याने पक्षाच्या नेत्यांकडून चाचपणी सुरू केली होती. विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचा नक्की कोण उमेदवार असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या चर्चेतच रात्री उशिरा राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मनपातील ‘त्या’ घडामोडींचे काय ?
महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे संतापलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची हकालपट्टी केली होती. ज्यांच्या आदेशावरून नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते, त्याच जगताप कुटूंबात लोकसभेची उमेदवारी देण्याच्या विषयाची शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.