Nagar News : नगर दौर्‍यात महाविकाससाठी शरद पवारांनी टाकले फासे, बुधवारी मुंबईत जम्बो बैठक

अहमदनगर (Nagar ): पोलीसनामा ऑनलाइन – कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली नगर (Nagar ) जिल्हा बँक आपल्याकडे खेचून आणण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. मात्र, रविवारी झालेल्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फासे टाकत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना कानमंत्र दिला आहे.

येथील खासगी रुग्णालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यानंतर त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जगताप कुटुंबीयांतर्फे आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांनी पवार यांचा सत्कार केला.

तेव्हा बोलताना पवार म्हणाले, येत्या बुधवारी (२७ जानेवारी) यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत बैठक पार पडणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

दरम्यान, या बैठकीतच दुसरा धमाका केला जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या रणनीतीला खिंडार पाडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नरेंद्र घुले, राहुल जगताप, पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते.