‘नोकरीसाठी 35 लाख भरलेत, कॉपी करु द्या, नाहीतर आत्महत्या करेन’

औरंगाबाद : वृत्तसंस्था
औरंगाबादमध्ये कॉपी करताना पकडलेल्या तरुणाने आक्रस्ताळेपणा करून पर्यवेक्षकाला आत्महत्येची धमकी दिली. ”नोकरीसाठी 35 लाख रुपये भरले आहेत, कॉपी करु द्या, अन्यथा आत्महत्या करेन,” असे वक्तव्य करणारा भावी शिक्षक आहे.

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. या परीक्षा 27 एप्रिलपर्यंत असून शनिवारी विज्ञानातील ‘understanding discipline and pedagogy of school subject science’ विषयाचा पेपर होता.

हा पेपर डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन, नवखंडा या परीक्षा केंद्रावर एम थ्री हॉलमध्ये सुरु होता. पर्यवेक्षकांनी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी एका विद्यार्थ्याला कॉपीसह पकडले. त्या विद्यार्थ्याने खात्री करण्यासाठी उत्तरपत्रिका जमा केल्यावर थेट धमकीच दिली.

”मी नोकरीसाठी 35 लाख रुपये भरले आहेत. ही परीक्षा मला पास होणे आवश्यक आहे. कॉपी करु द्या, प्रश्नांची उत्तरे पाहून लिहू द्या अन्यथा कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करेन,” अशी धमकी देत हा परीक्षार्थी पळत सुटला. त्यानंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी समजावत त्याला परत वर्गात आणून बसवलं आणि शांत केले.

यापूर्वीच औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वीच कॉपी करताना पकडल्याने व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारली होती.