जनतेच्या वीज कंपनीवरील अरिष्ट टाळण्यासाठी वीजबिल भरा, ‘महावितरण’चे थकबाकीदारांना आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी(MSEDCL)असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर झाली आहे. या अत्यंत कठीण अवस्थेत महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी तसेच राज्याच्या वीजक्षेत्रातील संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे कळकळीचे आवाहन महावितरणकडून आले आहे.

गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 5 लाख 86 हजार वीजग्राहकांनी एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. सध्या वीजपुरवठा सुरु असलेल्या या सर्व ग्राहकांकडे तब्बल 576 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी आहे. जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 13 लाख 80 हजार ग्राहकांकडे सद्यस्थितीत तब्बल 1072 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी आहे.

मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचे संकट सुरु झाल्यानंतर महावितरणच्या आर्थिक संकटाला देखील सुरवात झाली. कोरोना संकटातील ‘लॉकडाऊन’मध्ये रिडींग घेता आले नाही. ‘अनलॉक’नंतर देण्यात आलेल्या सरासरी वीजबिलांची योग्य दुरुस्ती करण्यात आली. तसेच मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्याची प्रक्रिया देखील पूर्ववत झाली. ‘अनलॉक’नंतर मीटर रिडींगप्रमाणे देण्यात आलेली वीजबिले अचूक असल्याचा निर्वाळा वीजतज्ञांनी देखील दिलेला आहे. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील 5 लाख 86 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी माहे नोव्हेंबरपर्यंतच्या एकाही वीजबिलाचा भरणा केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये तब्बल 576 कोटी 91 लाख रुपयांची भर पडली आहे.

या थकबाकीदारांची संख्या (कंसात थकबाकी) पुढीलप्रमाणे – पुणे शहर – 2 लाख 24 हजार 127 (244 कोटी), पिंपरी व चिंचवड शहर – 79 हजार 115 (102 कोटी) तसेच ग्रामीणमध्ये मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर, हवेली, आंबेगाव, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांमधील 2 लाख 82 हजार 763 (230 कोटी 89 लाख) वीजग्राहकांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबरपर्यंत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमधील थकबाकीदारांच्या संख्येत 5 लाख 72 हजारांनी वाढ झाली आहे. परिणामी 644 कोटी 37 लाखांनी थकबाकी देखील वाढली आहे. मात्र ऑक्टोबरपासून वीजबिलांसह थकबाकी भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. थकबाकीच्या रकमेत वाढ झालेली असली तरी पुणे जिल्ह्यातील 39 हजार थकबाकीदारांनी नोव्हेंबरमध्ये थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 13 लाख 80 हजार 300 ग्राहकांकडे 1072 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून थकबाकीदारांशी थेट संपर्क व संवाद साधून करण्यात येत आहे.

गेल्या 15 वर्षांमध्ये विविध गंभीर संकटांवर मात करीत महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशपातळीवर नावलौकीक मिळविला आहे. जागतिक तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा आता वीजग्राहकांना घरबसल्या मोबाईल ॲपसह ‘ऑनलाईन’द्वारे उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेतीन कोटी वीजग्राहक हे महावितरणचे आहेत. फोटो मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यास प्रारंभ करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी आहे. मात्र वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.

महावितरणच्या या गंभीर आर्थिक कोंडीच्या परिस्थितीत वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. याशिवाय लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. यासोबतच ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.