सावधान ! वीज बिलाचा चेक बाऊंस झाल्यास 750 रूपये दंड, जाणून घ्या

मुंबई : सध्या कोरोनामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झाला असून विजबिलांचे धनादेश उशिरा वटत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून केले आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्यता वर्तविली आहे.

तसेच काही कारणास्तव धनादेश (चेक) बाऊंस झाल्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी ७५० रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागेल.

वीज ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाई,ल त्याच दिनांकाला ती रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित आहे. प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद केलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिल भरण्यासाठी धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटविण्यास उशिर होत आहे. वीजबिलांवर महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीचा वापर करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

दरम्यान, जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग आणि वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या वीजवापराचे मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल दिले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यात येत आहे.