वयोवृद्ध, अपंगांना ‘घरपोच’ मिळणार रोख रक्कम, Paytm payments Bank ची खास सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेटीएम पेमेंट्स बँकेने शुक्रवारी (दि.15) ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांसाठी एक विशेष सुविधा सुरु करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने याचे नाव ‘कॅश अ‍ॅट होम’ असे ठेवले आहे. या सुविधेअंतर्गत कोरोना व्हायरसच्या या काळात वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना पैसे काढण्यासाठी बाहेर पडावे लागणार नाही. ज्या लोकांचे दिल्ली एनसीआरमधील पेटीएम बँकेत खाते आहे ते बँकेच्या अ‍ॅपद्वारे रोख रक्कम काढण्यासाठी विनंती करून शकतात आणि बँक त्यांच्या घरी रोख रक्कम पाठवेल.

पीपीबीएलने म्हटले आहे की, बँकेच्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कमेच्या मागणीसाठी विनंती पाठवल्यानंतर त्या व्यक्तीला दोन दिवसांत घरपोच रक्कम पोहचवली जाईल. या सुवेधेअंतर्गत पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहकाला किमान 1 हजार आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये घरी पाठवण्याची विनंती पाठवता येऊ शकते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ही सेवा सध्या फक्त दिल्ली एनसीआरमध्ये उपलब्ध आहे. पीपीबीएल ही सेवा देशाच्या इतर भागातही वाढवू शकते. हे कंपनीच्या कामकाजाशी संबंधित क्षमता आणि आवश्यक परवानग्यांवर अवलंबून आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीशकुमार गुप्ता म्हणाले की, आम्ही डिजिटल बँकिंग नेटवर्कच्या विस्तारासाठी सातत्याने काम करत आहोत. आमचा प्रयत्न आहे की त्यांच्या नवीन वैशिष्ट्यांद्वारे लाखो ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा. वय, आरोग्य किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जे लोक एटीएम किंवा बँकेच्या शाखेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी आमची कॅश अ‍ॅट होमची सुविधा खूप उपयुक्त ठरले.