महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्र्यांनाच स्थान नाही; सत्ताधारी भाजपा अन् प्रशासनाकडून राजशिष्टाचाराचा ‘भंग’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पूलाच्या रँम्पचे उद्घाटन आज झाले. या निमंत्रण पत्रिकेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनाच स्थान देण्यात आले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असून प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाच्या विरोधात आक्षेप नोंदविला आहे.

विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन घेण्यात येते. यावेळी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचारानुसार जिल्हाचे पालकमंत्री, आमदार, खासदार, मनपाचे पदाधिकारी तसेच ज्या प्रभागात कार्यक्रम असेल त्या स्थानिक नगरसदस्यांची नावे टाकने बंधनकारक आहे.

परंतु राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आहे. परंतु महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर अद्याप राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही. ही खेदाची बाब आहे, राज्यात जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा गिरीश बापट पुणे जिल्हाचे पालकमंत्री झाले होते. तेव्हा मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. तेव्हा मनपाच्या निमंत्रण पत्रिकेत गिरीश बापट यांच्या नावाच्या तत्काळ समावेश केला होता. परंतु भाजपाचे पदाधिकारी हा मोठेपणा दाखवत नाहीत. त्यामुळे आम्हांला पालकमंत्र्याचे नाव मनपाच्या निमंत्रण पत्रिकेत समावेश करण्याबाबत पत्र द्यावे लागत आहे, ही खेदजनक बाब आहे.तरी त्वरीत या चुकीची सुधारणा सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाने करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.