‘पीसीएनटीडीए’ अंर्तगत येणारी घरे फ्री होल्ड करा : आमदार महेश लांडगे यांची मागणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या  (पीसीएनटीडीए) अंतर्गत येणारी सर्व घरे तत्काळ मालकी हक्काने (फ्री होल्ड) करण्यात यावीत. यासाठी एक रुपया देखील प्रीमिअम किंवा आर्थिक भार लावू नये. घरे मालकी हक्काची करुन भोसरी मतदार संघातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन दिले आहे. त्यात आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, शहरातील गावठाणे वगळून सर्व जमिनी प्राधिकरणाने वेळोवेळी संपादित केल्या आहेत. त्यानंतर प्राधिकरणाने भूखंड विकसित करत वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्या, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना वितरीत केल्या. त्या भूखंडावर आजघडीला रहिवाशी सोसायट्या, व्यापारी संकुले उभीर राहिली आहेत. परंतु, त्याला सुमारे 30 ते 40 वर्षाचा काळ उलटूनही प्राधिकरणाने जागेचा मालकी हक्क स्वत:कडे ठेवला आहे. तर, इतरांना भाडेपट्याचा दर्जा दिला आहे.

त्यामुळे प्रत्येक कामाच्या वेळी प्राधिकरणाकडून ना-हरकत (एनओसी)प्रमाणपत्र घ्यावे लागते. यामुळे नागरिकाचा मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च होतो. नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. हेलपाटे मारावे लागतात. यामुळे भोसरी मतदार संघातील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यासाठी या जमिनी तत्काळ मालकी हक्काच्या (फ्री होल्ड)करुन संबंधिताच्या मालकीच्या कराव्यात. यासाठी एक रुपया देखील  प्रीमिअम किंवा आर्थिक भार लावू नये. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

” प्राधिकरणाने 30 ते 40 वर्षाचा काळ उलटूनही जागेचा मालकी हक्क स्वत:कडे ठेवला आहे. प्रत्येक कामाच्या वेळी नागरिकांना प्राधिकरणाकडून ना-हरकत (एनओसी)प्रमाणपत्र घ्यावे लागते. या किचकट प्रक्रियेसाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च होतो. नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. हेलपाटे मारावे लागतात. यामुळे भोसरी मतदार संघातील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. प्राधिकरणाने  जमिनी तत्काळ मालकी हक्काच्या (फ्री होल्ड)करुन संबंधिताच्या मालकीच्या कराव्यात”.