कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर गुन्हेगारांचा हल्ला; तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुन्हेगारांनी तुफान दगडफेक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रामटेक नगर येथील टोली येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे 400 पोलिसांचा फौजफटा टोलीत पोहचला आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे.

रहाटे टोली, रामटेक नगर भागात असलेल्या एका झोपडपट्टीत जागोजागी हातभट्टीची दारु गाळली जाते. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे चालत असल्याने पोलिसांकडून या ठिकाणी वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र, त्याला न जुमानता या ठिकाणी असलेले गुन्हेगार पुन्हा काही दिवसांनी दारुच्या भट्ट्या आणि जुगार अड्डे सुरु करतात. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. पोलिसांनी कारवाई सुरु करताच गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. गुन्हेगारांनी महिला आणि लहान मुलांना पुढे करुन पोलिसांवर तुफान दगडफेक केली.

गुन्हागारांनी दगडफेक करुन वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. मोठ्या संख्येने गुन्हेगारांनी एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला केला. यामुळे पोलिसांची एकच भांबेरी उडाली. त्यांनी या प्रकरणाची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. तसेच अतिरिक्त पोलिसांचा ताफा मागवून घेतला. वरिष्ठांनी याची तातडीने दखल घेऊन पोलिसांच्या मदतीसाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा पाठवला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी धरपकड सुरु केली आहे. दरम्यान, पोलिसांनी काही गुन्हेगारांना पकडले असून त्यांना पोलिस ठाण्यात आणून बसवले असून त्यांच्याकडून उर्वरित गुन्हेगारांची माहिती घेतली जात आहे.