वारंवार कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या ठिकाणी घंटागाडी जाणार नाही, त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ढकलगाडी वापरावी. वारंवार कचरा करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश घनकचरा विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.

शहरातील कच-या संदर्भात घनकचरा विभागाची आढावा बैठक मा.महापौर श्री बाबासाहेब वाकळे व मा.आयुक्‍त श्री.श्रीकृष्‍ण भालसिंग यांनी घेतली यावेळी उपायुक्‍त श्री.प्रदिप पठारे, श्री.सुनिल पवार, श्री.विलास ताठे, उपआरोग्‍याधिकारी डॉ.पैठणकर, मुख्‍य स्‍वच्‍छता निरिक्षक श्री.अन्‍वर शेख, स्‍वच्‍छता निरिक्षक श्री.कुमार सारसर, श्री.बीडकर, श्री रामदिन, श्री.भांगरे आदी उपस्थिती होते.

यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी शहरातील कचरा पूर्ण क्षमतेने उचलणे बाबत कार्यवाही करावी घंटागाडया व कचरा वाहनाच्‍या खेपा वाढवून ठिकठिकाणी असलेला कचरा उचलने बाबत कार्यवाही करावी. स्‍वच्‍छता निरिक्षक व मुकादम यांनी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या भागात फिरून साफ सफाई झाली का नाही याची पाहणी करावी.

ज्‍या ठिकाणी कचरागाडी जाणार नाही अशा ठिकाणी कामगारांना ढकलगाडी उपलब्‍ध करून देण्‍याबाबत सुचना देण्‍यात आल्‍या. वारंवार कचरा करणा-या नागरिकांवर दंडात्‍मक कारवाई करावी. रस्‍त्‍या लगतचे गवत काढणे तसेच मातीचे ढिगारे उचलणे बाबत कार्यवाही करण्‍यात यावी. पावसाळयापूर्वी मोठे नाले व छोटे नाले साफ सफाई करण्‍या बाबत सुचना दिल्‍या.

शहरामध्‍ये दुपारच्‍या सत्रात काही भागामध्‍ये कचरा आढळतो याकरिता दुपारच्‍या सत्रात कच-याच्‍या गाडया पाठवून कचरा उचलणे बाबत कार्यवाही करावी तसेच वैयक्तिक शौचालयाचे काम पूर्ण करण्‍यासाठी 15 तारीख देण्‍यात आलेली आहे त्‍यापूर्वी संबंधीत लाभार्थ्‍यांकडून वैयक्तिक शौचालय बांधून घेण्‍याबाबत कार्यवाही करावी.

तसेच शहर व उपनगरात प्रत्‍येक प्रभागात आवश्‍यक असलेल्‍या ठिकाणी औषध फवारणी करून घेण्‍याबाबत तसेच पावसाळा सुरू होणार असल्‍याने औषध फवारणी ,कचरा उचलल्‍यानंतर त्‍या ठिकाणी जंतूनाशक पावडर टाकणे बाबत नियोजन करून आवश्‍यक ते साहित्‍य उपलब्‍ध करणे बाबत कार्यवाही करावी.