कारमध्ये एकटे असल्यावर मास्क न वापरल्यास लागेल दंड ? सरकारनं दिला नवा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक कडक कायदे करण्यात आले आहे. प्रत्येकाला बाहेर वावरताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे अनिवार्य केले आहे. पण अशात जर कारमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल आणि काचा बंद असतील तर मास्क वापरणे अनिवार्य आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दिल्ली पोलिसांनी कारमध्ये एकटे प्रवास करत असताना मास्क न वापरणाऱ्या चालकांना दंड ठोठावला आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, आम्ही असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. ज्यामध्ये कार चालवताना एकटे असल्यावर मास्क वावरणे गरजेचे आहे. जर तुम्ही इतर लोकांसोबत एकाच कारमधून प्रवास करत असाल तर मास्क घालणे गरजेचे आहे असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

प्रवासादरम्यान अनेक लोक हे बस किंवा खासगी गाडीने एकत्र प्रवास करत असतात. अशा वेळी जर तुम्ही प्रवास करत असाल आणि बसमध्ये जास्त लोक असतील तर मास्क वापरणे हे बंधनकारक असणार आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळावे लागणार आहेत. पण जर तुम्ही तुमच्या स्वत:च्या कारमधून एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला मास्क वापरणे बंधनकारक नसणार आहे.

याचप्रमाणे व्यायाम करताना लोक एकांतात व्यायाम करत असतील तर हाच नियम याठिकाणी देखील लाग होतो. पण, जास्त लोक जसे, सायकलिंग करत असतील तर किंवा इतर व्यायाम करत असतील तर मास्क वापरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही एकटे सायकल चालवत असाल तर मास्क वापरणे बंधनकारक नाही.

दिल्ली पोलिसांनी 15 जून ते 2 सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, थुंकणे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. याच दरम्यान 15 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत केलेल्या कारवाईत 2 लाख 60 हजार 991 जणांकडून दंड आकारण्यात आला आहे. या दंडाची रक्कम रक्कम 13 कोटी रुपये इतकी आहे.

दिल्ली पोलिसांनी ज्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले नाही अशा लोकांकडून दंड वसूल केला आहे. एवढंच नाही तर दिल्ली पोलिसांनी दंड वसूल केल्यानंतर 15 जून ते 2 सप्टेंबरपर्यंत 2 लाख 47 हजार 007 लोकांना मास्कचे वाटप केले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कारमध्ये एकटा असलेला व्यक्ती हा सार्वजनिक ठिकाणी आढळून आला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.