पेन्शनधारकांना नवीन वर्षाचं गिफ्ट ! लाईफ सर्टिफिकेटबाबत सरकारनं केली मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षाच्या अगोदरच मोठी घोषणा केली आहे. ज्यास तुम्ही नवीन वर्षाची भेट समजू शकता. केंद्र सरकारच्या या आदेशानंतर आता पेन्शनर्स लाईफ सर्टिफिकेट म्हणजे आपण हयात असल्याचे प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत जमा करू शकतात. यापूर्वी पेन्शनर्संना लाईफ सर्टिफिकेट 1 नोव्हेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत जमा करायचे होते. ज्यास केंद्र सरकारने कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्ससोबत विचारविनिमय करून वाढवले आहे.

केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी हा निर्णय कोरोना महामारीचा वाढता प्रभाव पाहून घेतला आहे. या निर्णयानंतर आता पेन्शनर्स 1 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 च्या दरम्यान आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतील. यादरम्यान पेन्शनर्संना त्यांची पेन्शन मिळण्यात अडचण येणार नाही.

80 पेक्षा जास्त वयाच्या पेन्शनर्संना खास सुविधा –

सरकारी नियमानुसार प्रत्येक पेन्शनर्सला प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. ज्यानंतरच सरकार पेन्शनर्संची पेन्शन चालू ठेवते. जर एखाद्या पेन्शनर्सने या काळात आपले लाईफ सर्टिफिकेट जमा केले नाही, तर त्याची पेन्शन रोखली जाते. अशावेळी केंद्र सरकारने 80 वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ पेन्शनर्सला 1 ऑक्टोबरपासूनच लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा दिली.

पोस्टमनच्या मदतीने घरबसल्या जमा करा सर्टिफिकेट –

केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठी नुकतीच एक नवीन सुविधासुद्धा सुरू करण्यात आली आहे आणि ती आहे पोस्टमनद्वारे पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन सबमिट करण्यासाठी घराच्या दरवाजापर्यंत सेवा देणे. मात्र, या सर्व्हिससाठी चार्ज लागणार आहे आणि ती देशभरात केंद्र सरकारच्या सर्व पेन्शनसाठी उपलब्ध असेल.