पेन्शनरांच्या पुण्यात पेन्शनर उमेदवार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (मल्हार जयकर) – देश तरुण होत चाललाय…. ५५ ते ६० टक्के तरुण मतदार आहेत, असं सांगितलं जातं असताना मात्र काँग्रेस पक्षानं आणि भाजपनं पुण्यात वयाची ६७ वर्षे पार केलेल्या….वयाने पेन्शनर असलेल्यांना उमेदवारी बहाल केलीय !

पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसपक्षानं सगळ्याप्रकारची चाचपणी करून मोहन जोशी या ६७ वर्षांच्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे तर भारतीय जनता पक्षानं पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसकडे अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड या इच्छुकांनी पेन्शनरांच्या वयाची मर्यादा गाठलेली नाही. भाजपनंही मुरली मोहोळ, योगेश मुळीक या तरुण इच्छुकांना डावललं आहे. त्यामुळं आता दोन्ही पक्षांच्या पेन्शनर उमेदवारांनी तरुणांना आपल्या कामाला जुंपलं आहे.

जगामध्ये भारत हा अत्यंत तरुण देश असल्याचं स्पष्ट झालंय. जवळपास आठ कोटी तरुण प्रथमच मतदान करत आहेत. अशा तरुण मतदारांवर काँग्रेस आणि भाजपनं लक्ष केंद्रित केलंय. पक्षाचे नेते तरुणांना आपल्यालाच मतदान करावं असं आवाहन करताहेत. तरुणांची मतं हवी आहेत पण, उमेदवारी द्यायला नकोय. पक्षाच्या नेतृत्वाची ही मानसिकता कधी बदलणार ? हा प्रश्न तरुणांच्या मनात निर्माण झालाय.

काँग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपचे गिरीश बापट यांनी आपली राजकीय सुरुवात एकाच वेळी केलीय. मोहन जोशी यांच्या सोबत धनंजय थोरात, वीरेंद्र किराड, अभय छाजेड असे समवयस्क सहकारी होते. त्यांनी युवक काँग्रेसची धुरा सांभाळली होती. दिल्लीतून येणाऱ्या नेत्यांना, मंत्र्याना या तरुणांचाच आधार असे. ते इथं आल्यापासून दिल्लीला परतेपर्यंत हे तरुण कार्यकर्ते त्यांच्यासोबत असत. सत्तेच्या राजकारणात रमलेल्या या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनता पक्षाचा आणि आता भाजपच्या सत्तेच्या काळातच काय तो विरोधी पक्षाचा अनुभव ! तो ही त्यांनी गाजवला. थेट मोरारजींच्या गाडीपुढे आडवं पडून आंदोलन केलं होतं.

भाजपचे गिरीश बापट हे युवा मोर्चाचे कार्यकर्ते. बापट, विजय काळे, योगेश गोगावले यांनी एकाचवेळी भारतीय जनसंघाचे काम सुरू केलं. युवा मोर्चाचे काम करत असतानाच त्यांनी सत्तेविरोधात अनेक आंदोलने केली. बापट मात्र सत्तेच्या राजकारणात नशीबवान ठरले. शांताराम जावडेकर नावाचे नगरसेवक नागरी संघटनेच्या वतीने निवडून आले होते. पण त्यांनी काँग्रेसच्या मदतीनं स्थायी समिती अध्यक्षपद मिळवलं होतं. त्यानंतर त्यांनी नैतिकता म्हणून नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्या रिकाम्या झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. तिथं जनसंघानं बापट यांना उमेदवारी दिली. तिथं बापटांनी जावडेकरांचा पराभव केला. त्यानंतर बापटांनी सत्तेच्या राजकारणात मागे वळून पाहिलंच नाही. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पाच वेळा आमदार, मंत्री, पालकमंत्री एका पाठोपाठ एक पदं मिळत गेली. आता लोकसभेची उमेदवारी मिळालीय !

मोहन जोशी यांना सत्तेतील दिल्लीतील नेत्यांचा आधार होता. त्यामुळं नगरसेवक, विधानसभा अशी कोणतीही निवडणूक न लढविता त्यांना लोकसभेची दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालीय. नाही म्हणायला जोशी विधान परिषदेतील आमदार होते. गिरीश बापट तसे नशीबवान ! त्यांना सत्तेतील सारी पदं एकापाठोपाठ सहजगत्या मिळत गेली. पण काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे तरुण उमेदवार असताना त्यांना डावलून पेन्शनरीकडे गेलेल्यांना उमेदवारी दिली गेलीय.