चीनला रोखण्यासाठी अमेरिका ‘ऍक्शन मोड’वर; बायडेन सरकार उचलतंय ‘हे’ मोठं पाऊल!

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसमुळे जगभरातून चीनवर टीका केली जात आहे. तसेच विविध देशांनी चीनसोबतचे व्यावसायिक संबंधही तोडले आहेत. त्यानंतर आता चीनसाठी अमेरिकेने नवी रणनीति आखली आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नव्या टास्क फोर्सची घोषणा केली.

कोरोना व्हायरस आणि दक्षिण चीन भागात चीनच्या हस्तक्षेपामुळे अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनला धडा शिकविण्यासाठी सुरक्षा विभागातील विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पेंटागनच्या दौऱ्यादरम्यान बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले, की हा अभ्यास महत्त्वपूर्ण होता. यामध्ये चीनच्या रणनीतिविरोधात मोठ्या धैर्याने पुढे जाता येऊ शकेल. अमेरिकेला हिंद-प्रशांतसह जगभरात शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि अमेरिकेच्या हितासाठी चीनकडून निर्माण होत असलेल्या आव्हानांवर लगाम लावणे गरजेचे आहे.

नव्या युगात क्षमता वाढविण्याची आवश्यकता

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सांगितले, की बीजिंगशी निगडीत उच्च प्राथमिकता असणाऱ्या प्रकरणांवर तातडीने विचार केला जाईल. ज्यामध्ये द्विपक्षीय सुरक्षा संबंध, गुप्तचर आणि अमेरिकेतील आघाडी आणि भागीदारीचा समावेश आहे. त्यासाठी येत्या चार महिन्यात पावले उचलली जातील. अमेरिकेला सायबर स्पेसमध्ये आपली क्षमता वाढविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातून टीका

कोरोना व्हायरसची निर्मिती चीनमधून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जगभरातून चीनवर टीका केली जात होती. तसेच अनेक देशांनी चीनसोबत असलेले व्यावसायिक संबंधही तोडले होते. भारतानेही चीनचा निषेध करत अनेक चीनी ऍप्सवर बंदी घातली होती.