अरेरे…गडचिरोलीत जनमाहिती अधिकारीपदी शिपायाची नियुक्ती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गडचिरोली जिल्ह्यात एका शिपायालाच जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आयोगाने या प्रकाराची दखल घेत मुख्याधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकार्‍यांना केली आहे.

युती सरकारच्या काळात माहिती आयुक्तांची पदे रिक्त ठेवण्यात आली होती. तीच परंपरा आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू आहे. माहिती आयुक्तांची सातपैकी तीन पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून नाशिक, पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या माहिती आयुक्तपदांचा कारभार सध्या अतिरिक्त कार्यभारावर सुरू आहे.

दरम्यान, लोकांना हवी ती माहिती मिळत नसल्याची हजारो प्रकरणे विविध माहिती आयुक्तांकडे सुनावणीच्या, न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच सरकारी पातळीवरही या कायद्याची खिल्ली उडविली जात आहे. यासंदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगर पंचायतीमध्ये जनमाहिती अधिकारी म्हणून एका शिपायाची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.