शेतकरी आंदोलन : देशातील जनतेने स्वयंस्फुर्तीने ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे , खा. संजय राऊत यांचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन, तसेच केंद्राकडून राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण आदी मुद्द्यांवर शिरोमणी अकाली दलाने घेतलेल्या भूमिकेशी शिवसेना सहमत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अकाली दलाचे नेते, खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी ही माहिती दिली. तसेच उद्याच्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करून शिवसेना शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच शेतकरी आपला अन्नदाता असल्याने त्यांच्याप्रती आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे देशातील जनतेने स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

खासदार चंदूमाजरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना आणि अकाली दलाचे नेते प्रथमच भेटले. चंदूमाजरा म्हणाले की, शेतकरी आणि सरकारमधील चर्चा यशस्वी व्हावी, अशीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांशी चर्चा न करताच हे कायदे बनविले आहेत. दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमारेषेवर पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. आंदोलनास दिग्गजांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून काँग्रेसनंतर आता शिवसेनेही पाठिंबा दिला आहे.