काय सांगता ! होय, मुख्यमंत्रीपदी फडणवीसच रहावेत म्हणून चक्क ‘जागरण’ गोंधळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच कायम राहावेत यासाठी खंडोबाला साकडे घालण्यासाठी भाजपाच्या दलित आघाडीने जागरण गोंधळ घातले. लालटाकी परिसरात झालेले हे जागरण-गोंधळ चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.

मिरवणूक व भंडाऱ्यात गर्दी जागरण-गोंधळ नवसपूर्तीसाठी लालटाकी भागातून वाघ्या-मुरळीसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱ्याची उधळण केली जात होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष सुरू होता. भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन होते. शंकर काते व सीमा काते यांच्या हस्ते भंडारा वाटप झाले.

भाजप दलित आघाडीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष व भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान होण्यासाठी जेजुरीला जाऊन खंडोबाचा जागरण-गोंधळ घालण्याचा नवस केला होता. निकाल लागल्यानंतर महिनाभराने फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला. काते यांनी लालटाकीजवळ जागरण-गोंधळ करून नवसपूर्ती केली. या वेळी त्यांच्यासह अन्य भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत भाजपचे बहुमत सिद्ध होऊन मुख्यमंत्रिपदी फडणवीसच राहण्यासाठी खंडोबारायाला साकडेही घातले.

या वेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट, दत्तात्रय जाधव, विशाल रोकडे, योसेफ काते, आकाश घोडके, सतीश रोकडे, दिलीप लोखंडे, अमोल काते, वच्छला गालफाडे, बेबी कांबळे, आशा मोहिते, छाया त्रिभुवन, छबूबाई खंडागळे, सुशीला काते, अनिता जाधव, आजिनाथ काते, अनिता लोखंडे, अनिता वैरागर, सागर काते आदी उपस्थित होते.

Visit : Policenama.com