Pune News : दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर बंद तरीही भाविकांची ‘झुंबड’

पुणे : अंगारकी चतुर्थी निमित्त गणरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता होती. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर आज बंद ठेवण्याचा व लोकांनी ऑनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु, ज्या उद्देशाने मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्या उद्देशाला हरताळ भाविकांकडून फासण्यात आला.

मंदिर बंद असले तरी रस्त्यावरुन दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविक मोठ्या संख्येने मंदिराबाहेर घेऊ लागले होते. शिवाजी रोडवर लोक दर्शनासाठी जमू लागले. त्यामुळे शिवाजी रोडवरील वाहनांना मंदिरासमोरुन पुढे जाणे अशक्य होऊ लागले होते. त्यामुळे सकाळपासूनच शिवाजी रोडवर वाहतूक कोंडी दिसून येत होती.

दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये तरुणतरुणींची संख्या मोठी आहे. भाविकांनी मास्कचा वापर केलेला दिसून येत होता. अंगारकी तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी २ ते ३ लाख लोक दिवसभरात येत असतात. पुण्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विश्वस्तांनी आज दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे. तरीही भाविक मोठ्या संख्येने मंदिराबाहेर गर्दी करीत आहेत़.