10 फूट लांबीच्या ‘मगरी’ला लोकांनी मारून ‘खाल्लं’, छोटे-छोटे तुकडे करून गावात वाटले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ओडिसामधील एका खेड्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथे मलकानगिरी जिल्ह्यातील कलडापल्ली गावात लोकांनी केवळ मगर पकडलाच नाही तर त्याला ठार मारुन खाल्ले. या संपूर्ण घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्रशासन आणि वनविभागात खळबळ उडाली आहे. आता वनविभागाचे अधिकारी मगरी खाणार्‍या लोकांचा शोध घेत आहेत.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलडापल्ली गावच्या पोडिया ब्लॉकजवळ साबेरी नदी आहे. येथे काही ग्रामस्थांनी दहा फूट लांबीचा मगर पकडला आणि दोरीने बांधून त्याला गावाच्या आत आणले. यानंतर लोकांनी मगरीला धारदार शस्त्राने ठार मारले आणि झाडाला उलटे टांगले. मगरी पकडणारे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी प्रथम मगरीचे पंजे तोडले आणि नंतर त्याचे अनेक छोटे तुकडे केले आणि ते गावकऱ्यांना वाटले. सूत्रांनी म्हटले आहे की शिकारींनी मगरीला मारले कारण ते वारंवार गावात प्रवेश करीत असे आणि त्यांच्या गायी, बकऱ्या खात असे. एवढेच नव्हे तर बर्‍याच वेळा मगरीने गावकऱ्यांवर देखील हल्ला केला होता.

मलकानगिरीचे जिल्हा वन अधिकारी प्रदीप देबिदास यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जेव्हा काही गावकऱ्यांकडून मगरीची शिकार आणि त्यास ठार मारून खाल्ल्याची बातमी समजली तेव्हा आम्ही रेंजर स्टाफला कलडापल्ली गावात पाठविले पण त्यांना मगरीच्या शरीराचे अवयव मिळाले नाहीत. आम्ही मगरींची शिकार करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तीन टीम बनवल्या आहेत. लवकरच आम्ही त्यांना पकडणार.

सध्या वनविभागाकडून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या फोटोंच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. मलकनगिरी नक्षलग्रस्त आदिवासी भागात येते. यापूर्वीही अशा घटना याठिकाणी उघडकीस आल्या आहेत.