अद्यापही चित्रपटगृह प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील चित्रपटगृहे सुरू होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, चित्रपटगृहे अजूनही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. एका शोला केवळ चार ते पाच प्रेक्षक उपस्थित राहत असल्याचे आढळून येत आहे, तर नवे चांगले चित्रपट नसल्याने अशी परिस्थिती दिसत असून, पुढील आठवड्यात काही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी होईल, असा विश्वास चित्रपटगृहचालकांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला. यात राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहेही बंद करण्यात आली. त्यानंतर आठ महिन्यांनंतर राज्य सरकारने मिशन बिगीनअंतर्गत सिनेमा आणि नाट्यगृहे उघडण्यास परवानगी दिली. त्यानुसार 15 नोव्हेंबरच्या सुमारास शहरातील चित्रपटगृहे उघडण्यात आली. दर दिवशी इंग्रजी आणि हिंदी चित्रपटांचे सात ते आठ शो आयोजित केले जात आहेत. तुलनेने त्यांना मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. शुक्रवारी आणि शनिवारी पुण्यातील काही चित्रपटगृहांमध्ये एका शोमध्ये केवळ 11, 12 अशी प्रेक्षक संख्या नोंदवली आहे. वीकएंड असूनही प्रेक्षक संख्या कमीच असल्याने चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे चित्रपटगृहांमध्ये स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेतली जात असून, सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळले जात आहेत. प्रेक्षकांनी न घाबरता चित्रपटगृहांमध्ये यावे, असे आवाहन चित्रपटगृहचालकांनी केले आहे.

याबाबत सिटी प्राईडचे संचालक ऋषी चाफळकर म्हणाले की, प्रेक्षकांची चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहण्याची सवय मोडली आहे. त्यांना पुन्हा सवय लावण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. शिवाय मोठ्या बॅनरचे चित्रपट जोपर्यंत प्रदर्शित होत नाहीत, तोपर्यंत चित्रपटगृहात प्रेक्षक येतीलच, अशी शाश्वती नाही. पण तरीही आम्ही चित्रपटगृहे सुरू ठेवणार आहोत.

स्वच्छता, फिजिकल डिस्टन्सिंगला प्राधान्य
चित्रपटगृहे सुरू होऊन एक आठवडा झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही चित्रपटगृहांची पाहणी केली असता, सिटी प्राइड, आयनॉक्स, पीव्हीआर अशा मल्टिप्लेक्समध्ये स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याचे आढळून आले. चित्रपटगृहांच्या तिकीट खिडकीपासून ते स्क्रीनपर्यंत सर्व ठिकाणी सुरक्षित अंतरच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे दिसून आले. मास्कशिवाय कोणत्याही प्रेक्षकाला चित्रपटगृहात प्रवेश दिला जात नसल्याचेही चित्रपट गृहचालकांनी सांगितले.