‘कोरोना’पेक्षा एका कुत्र्याची लोकांना अधिक भीती ! पकडणाऱ्यास मिळणार 12 हजार रुपयांचं ‘बक्षीस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. तथापि अनलॉक 1 नंतर सरकारने बाहेर पडण्याचे आदेश दिले असले तरी या आदेशानंतरही पानिपतच्या यमुना एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातच राहावे लागत आहे. विशेष म्हणजे त्यांना घरात राहण्यास कोरोनामुळे नाही तर एका कुत्र्यामुळे भाग पडत आहे.

वास्तविक, यमुना एन्क्लेव्हमध्ये लोकांना एका कुत्र्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यानंतर इथल्या लोकांनी कुत्रा पकडणाऱ्यास बक्षीस देखील जाहीर केले आहे. असे सांगितले जात आहे की गेल्या 2 महिन्यांत या कुत्र्याने सुमारे 30 लोकांना शिकार बनवले आहे. एवढेच नव्हे तर सकाळ-संध्याकाळ चालत जाणाऱ्यांनाही हा कुत्रा लक्ष्य करीत आहे.

सोसायटीचे रक्षक, सफाई कामगार या कुत्र्याला पकडण्यात अपयशी ठरले आहेत. इतकेच नाही तर या कुत्र्याला पकडणाऱ्या टीमला बोलविण्यात आले, मनपाच्या पथकाने दोनदा प्रयत्नही केले पण हा कुत्रा कुणाच्याही हाती आला नाही. यानंतर कुत्र्याच्या दहशतीने त्रस्त झालेल्या यमुना एन्क्लेव्हच्या लोकांनी त्याला पकडण्यासाठी 12 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

सोसायटीच्या सहकाऱ्याने सांगितले की आम्हाला या कुत्र्याची कोरोनापेक्षा जास्त भीती वाटते, म्हणून या कुत्र्याला कॉलनीतून बाहेर काढणाऱ्याला 12 हजार रुपये बक्षीस देण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यांनी सांगितले की हा कुत्रा गेल्या दीड महिन्यांपासून लोकांना त्रास देत आहे. लोकांना कुत्र्यांची इतकी भीती वाटते की ते घराबाहेर पडण्याला देखील घाबरतात. पहिल्या लॉकडाऊनमुळे आम्ही घराबाहेर पडू शकलो नाही पण आता कुत्र्याची भीती आम्हाला बाहेर पडू देत नाही.