Coronavirus Lockdown : 14 तारखेनंतर लोक घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक लक 14 एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळं जिथं करोनाचे रुग्ण नाहीत, अशा भागातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करावा असं माझं मत आहे, मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितले. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

हसन मुश्रीफ म्हणाले, 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील कराव हे माझं वैयक्तिक मत आहे. मात्र, ज्या गावातील लॉकडाऊन शिथिल केला जाईल, त्या गावात इतरांना प्रवेश मिळता कामा नये. त्यासाठी त्या गावच्या सीमा 100 टक्के बंद केल्या पाहिजेत. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी सहभागी होणार आहे. यावेळी मी माझे मत मांडणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितलं.

जिल्ह्यातील रुग्ण मकरजशी संबंधित
नगर जिल्ह्यातील 25 रुग्णांपैकी 21 जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मरकजशी संबंधित आहेत. तर काही जण त्यांच्या संपर्कात आले आहेत. आणखी कुणी असेल तर त्यांनी स्वत:हून यावं. स्वत:ला व समाजाला संकटात टाकू नये, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. तसेच जगभरात कोरोनापासून कोणीच वाचू शकले नाही. ब्रिटनच्या पंतप्रधानांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाने वाघाला सुद्धा सोडले नाही. प्रगत देश मेटाकुटीला आलेत. आपल्या देशावरही फार मोठे संकट असून घरात राहणे हाच सध्याचा यावरचा एकमात्र उपाय आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.