‘त्यांना वाटलं संधी आलीय, आता अशोक चव्हाणांना ठोका, परंतु…’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन –    सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan)यांनी शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार घेतला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं एफआरपीचे पैसे थकले परंतु यावर्षी गाळप सुरू होण्याआधी शेतकऱ्यांचे 33 कोटी रुपये आम्ही दिले. विरोधक बोंबलले पण जनता माझ्या पाठीशी राहिली असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या (Bhaurao Chavan Sahakari Sakhar Karkhana) 25 व्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ झाला. मंत्री अशोक चव्हाण आणि राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गाळप समारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

अशोक चव्हाण म्हणाले, “गेल्या 24 वर्षांपासून साखर कारखान्याच्या विरोधकांना बोलायला संधी मिळाली नाही. मात्र आता त्यांना वाटलं की, संधी आली अशोक चव्हाणला ठोका…! पण जनता माझ्या पाठीशी आहे. तुम्ही कितीही बोंबलत रहा.” अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

अशोक चव्हाण यांच्या कारखान्याकडे एफआरपीचे पैसे थकल्यानं विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली होती. आज गाळप शुभारंभ प्रसंगी चव्हाण यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आज त्यांना विरोधकांवर बरसताना बघून सारेच अवाक् झाले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) यांनी सहकारी तत्वावर स्थापन केलेला कारखाना आहे. याच्या गाळप हंगामाला यंदा 25 वं वर्ष पूर्ण झालं आहे. या कारखान्यामुळं अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात आर्थिक सुबतता आली आहे.