पावसाळापूर्व कामाला मुहूर्त कधी, सामान्य नागरिकांची विचारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – महापालिका प्रशासनाकडून मे महिनाअखेर पावसाळी वाहिन्या, ओढे-नाले स्वच्छ करण्याची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, हडपसर आणि परिसरात कुठेही कामे सुरू असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या वर्षी पहिल्याच पावसात पालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडणार आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानेही जुनी आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटनी का केली जात नाही, असा संतप्त सवाल हडपसरवासीयांनी पालिका प्रशासनाकडे केला आहे.

हडपसरमधील राजेंद्र राऊत म्हणाले की, मे महिना म्हटले की, उन, वारा आणि अवकाळी पावसाचे दिवस आठवतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस हजेरी लावतो. या पावसामध्ये जुनी झाडे उन्मळून पडतात, तर मोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागाकडून जुने आणि वाढलेले वृक्ष छाटण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित आहे. मात्र, यावर्षी अद्याप या कमाला मुहूर्त मिळाला नाही, का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला पावसाळापूर्व कामे करण्यासाठी अत्यंत मोकळीक आहे. तरीसुद्धा पावसाळापूर्व कामांना अद्याप मुहूर्त मिळत नाही की काय, पावसाचे पाणी साचल्यानंतर जागे होणार का, नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन दुर्घटना घडण्याची वाट पाहात आहे का, पावसाळापूर्व कामाची माहिती विचारली तर, अधिकारी थेट आमच्याकडे माहिती नाही, असे सांगून मोकळे होतात, याचा काय म्हणायचे, अशी विचाऱणा हडपसरमधील अ‍ॅड. विनायक बोरकर यांनी केली आहे.

पावसाळ्यामध्ये दरवर्षी सखल भागात पाणी साचते, त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, तसेच ड्रेनेज स्वच्छता करावी, ओढे-नाल्यातील कचरा स्वच्छ करण्याच्या कामाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिक घरात थांबले आहेत. रस्त्यात कुठेही गर्दी नाही, काम करण्यास कोणताही अडथळादेखील नाही, तरीही पालिका प्रशासन अद्याप पावसाळापूर्व कामाकडे गांभीर्याने का पाहात नाही, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त सुनील यादव यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी माझ्याकडे काही माहिती नाही, असे सांगितले.