लॉकडाऊनमुळे समस्यांचा गुंता वाढतोय : प्रा. जीवन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आणि सगळ्यांचीच झोप उडाली. देशभर लॉकडाऊन झाल्यानंतर लवकरच परिस्थिती सुधारेल असे वाटले होते. मात्र, लॉकडाऊन संपण्याऐवजी ते वाढतच गेले. नोकरी-व्यवसाय ठप्प झाले, सर्वच मंडळी घरामध्ये कोंडून ठेवल्यासारखी होती. काहींचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. त्यातच अनेकांनी आपल्या गावचा रस्ता धरला. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणे आणि जाणेही कठीण झाले होते. गावाकडे जायचे म्हटले तरी परवानगी मिळत नव्हती, अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला. त्यामुळे अनेकांना रात्र-रात्र झोप लागत नाही, अशा तक्रारी वाढल्या. कोरोनाच्या भीतीने डॉक्टरांकडे जायचीसुद्धा भीती वाढत होती, अशा समस्या गुंता सोडविण्यासाठी अनेकांनी मानसोपचारतज्ज्ञाकडे धाव घेतल्याचे एन.डी.टी. कॉलजेचे मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. जीवन जोशी यांनी सांगितले.

प्रा. जोशी म्हणाले की, सेवानिवृत्त रोजंदारीवरील कामगारापासून सर्वांचीच अवस्था बिकट झाली. तशी कोणतीही चिंता नाही पण अलीकडे झोप लागत नाही, अशा तक्रारी दूरध्वनीवर समुपदेश करणाऱ्याकडे वाढू लागल्या. राज्य-परराज्यातील विविध भागात राहणारी मंडळींकडून येणारे दूरध्वनी करोना विषाणू आणि लॉकडाऊनचे परिणाम याविषयी विचारले जात आहे. स्वत:ची घरकोंडी करून घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यानंतर लोक जेव्हा बाहेर पडू लागले, तेव्हा त्यांना निर्मनुष्य रस्ते दिसू लागले. चौका-चौकात पोलिसांची गस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्या वेळी ते दृश्य जरी आघात करणारे वाटत नसले, तरी त्याचे परिणाम आता जाणवू लागत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावरून कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण तसेच, उपचारासाठीचे एक ना अनेक डोस पाजू लागले. बेरात्री ‘वॉटस्अ‍ॅप’वर संदेश पाठविणाऱ्याचे प्रमाण वाढले. लॉकडाऊननंतर समूह मानसिकता बदलू लागली. भीती ही भावना मेंदूमध्ये प्राधान्याने पुढे येते. त्यामुळे काळजी घेऊ आणि बाहेर पडू असे सारखे सारखे सांगितले जात असल्याने निष्काळजीपणा तर झाला नाही ना, यामुळेही निद्रानाश हा विकार जडू लागला आहे. अधिकारीपदावरील व्यक्तीने दूरध्वनी करून झोप येत नसल्याची तक्रार केली. अशीच अवस्था रिक्षाचालकाचा असल्याचा अनुभव व्यक्त केला जात आहे. मागिल तीन महिन्यामध्ये कोरोना विषाणूबरोबरच भीतीची भावनाही बळावली आहे. काही महिन्यापूर्वी कोरोना विषाणूमुळे काळजी वाढली. पुढे ती जागा भीतीने घेतली. जगावे कसे या भीतीची चिंता वाढत गेली. आता चिंता जुनाट झाली आहे. त्या विरोधातील बंड म्हणून सारे जण आता करोना जणू नाहीच, असे म्हणून धावू लागले आहेत. आता भीती विरोधातील आक्रमकता म्हणून समूह वर्तनाकडे पाहावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मानवाच्या मनावर काही दृश्य परिणाम होत असतात. साप स्वप्नातही दिसतात आणि प्रत्यक्षातही, अशी काहीशी अवस्था निर्माण झाली. परिणाम वेगवेगळे असतात. तसेच या अदृष्य विषाणूचेही मानसिक परिणाम दिसू लागले आहेत. त्याचे लक्षण म्हणून निद्रानाशाच्या तक्रारी वाढल्या आहेत. ज्या मंडळींचे हातावरचे पोट आहे त्याची भीती ही विषाणू नसून, भूक असू शकते. त्यामुळे त्यांचे वर्तन बेदरकार वाटू शकते. भीतीचा भाग चिंतेमध्ये झाल्याने निद्रानाशाचे विकार जडू लागले आहेत. या आठवडय़ाभरात झोप येत नसल्याच्या दूरध्वनींची संख्या दररोज वाढू लागली आहे.
‘वाढती गर्दी म्हणजेच भीतीविरुद्धचे बंड’

आज प्रत्येकाच्या मनात कोरोना विषाणूविषयी भीती आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी बंड म्हणून लोक बाहेर पडू लागले आहेत. ज्यांना दररोजच्या जगण्याची भ्रांत नाही, अशा व्यक्तींची गर्दी हे त्याचेच लक्षण आहे. त्याला इतरही काही पदर आहेत. मात्र, भीतीवर मात करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वागणे बरोबर नाही, असे आवाहन केले जात आहे. शहरातील अनेक भागात मुखपट्टी बांधली जात नाही. नाकाला उघडे ठेवून हनुवटीला पट्टी बांधणारे अनेक महाभाग आहेत. अशाने हा रोग अधिक पसरेल, असा इशारा डॉक्टर मंडळी वारंवार देत आहेत. मात्र, मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी व्यक्त होणे हा पर्याय आहे. झोप पूर्ण होत नसेल तर त्याचे परिणाम रक्कदाब वाढण्यावर होऊ शकतो.

असे काही पर्याय..
कामामध्ये व्यक्त राहणे हा एक पर्याय.
कथा-कादंबरी, आवडीच्या विषयामध्ये गुंतून राहणे.
आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्यांचाच विचार करणे हिताचे आहे.
भावनिक सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.