पत्नीची छेड, पोलीस उपनिरीक्षकाला बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भावाला भेटण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पत्नीसमवेत रुग्णालयात गेले होते. त्यावेळी एका टोळक्याने त्यांच्या पत्नीची छोड काढली. पत्नीची छेड का काढली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकास सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली.

तसेच त्यांचे टॅक्सीतून अपहरण करुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्तीवरील पोलिसांना हा प्रकार दिसताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षकाची सुटका केली. हा प्रकार नुकताच मुंबई येथील केईएम रुग्णालयासमोर घडला. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींचे इतर साथिदार फरार झाले आहेत.रफी अहमद असे मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

रफी अहमद हे किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचा भाऊ आजारी असल्याने त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याला बघण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात गेले होते. पिण्याच्या पाण्याची बाटली घेण्यासाठी दोघेही केईएम रुग्णालयासमोरील दुकानात जात असताना येथे उभ्या असलेल्या फेरीवाल्यांनी उपनिरीक्षकाच्या पत्नीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. पहिल्यांदा दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. पण फेरीवाल्यांची शेरेबाजी सुरूच होती. याबाबत उपनिरीक्षकाने यातील एका तरुणाला हटकले. यामुळे या तरुणासोबत असलेले इतर पाचही तरुण संतापले.

त्यांनी उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांनी जवळच्याच टॅक्सीमध्ये या उपनिरीक्षकाला कोंबले. टॅक्सीतून मारहाण करीत नेत असताना उपनिरीक्षकाने मदतीसाठी आरडाओरडा केला. पादचाऱ्यांनी हे ऐकून जवळून जाणाऱ्या पोलिसाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिस मागावर असल्याचे कळताच चालकाने टॅक्सी थांबवली. उपनिरीक्षकाने संधी मिळताच या तरुणांच्या तावडीतून सुटका करून घेतली.

पोलिस उपनिरीक्षक आणि पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौघे अद्याप फरार आहेत. ही सर्व घटना येथील सीसीटीव्हींमध्ये कैद झाली आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यास टाळाटाळ
पोलिस उपनिरीक्षक आणि त्याची पत्नी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले. आपण पोलिस असल्याचे सांगूनही ड्युटीवर असलेल्या पोलिस निरीक्षकाने तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. उलटसुलट प्रश्न विचारात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करू लागला. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दखल घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.