नोटबंदी, टाळेबंदीमुळे महिलांचा नोकऱ्यांमधील टक्का घसरला, अर्थतज्ज्ञांचे निरीक्षण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आजवर दर्जेदार शिक्षण, मुलांच्या जबाबदा-या, कामांच्या ठिकाणी येणा-या अडचणी यामुळे महिलांना रोजगार, नोकरीसंदर्भात अडचणी येत होत्या. मात्र आता नोटबंदी, जीएसटी, कोविडसाठी पुकारलेल्या टाळेबंदी आदीमुळे रोजगार गळतीला वेग आला आहे. परिणामी चालू वर्षात 15 ते 44 वयोगटातील 52.4 टक्के महिलांनी रोजगार गमावला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी, इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने ‘वुमन ॲट वर्क’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदे आयोजन केले होते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास, आयआयटी दिल्लीतील मानववंशशास्त्र विभागाचे प्राध्यापक रवींद्र कौर या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पीआयसीचे उपाध्यक्ष विजय केळकर, प्राध्यापक प्रदीप आपटे यांनी परिषदेचे संचालन केले. सीएमआयईने 2019-20 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार पुरुषांच्या (63.68 टक्के) तुलनेत महिला रोजगाराचे प्रमाण 7.34 टक्के आहे. ग्रामीण भागात पुरुष रोजगाराच्या (68.16) तुलनेत महिला रोजगाराचे प्रमाण 9.70 टक्के राहिले.

शिक्षित महिला देखील रोजगाराच्या प्रवाहाबाहेर
दिवसेंदिवस रोजगारातील महिलांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. अगदी शिक्षित महिला देखील रोजगार प्रवाहातून बाहेर पडत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्या घरीच राहणे पसंत करतात अथवा घरगुती व्यवसाय करण्यास पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. कृषी क्षेत्रातील रोजगार कमी होत असल्याने महिलांचा रोजगारातील टक्का कमी होत असल्याचे प्रा. रवींद्र कौर यांनी सांगितले.