‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पीएमपीच्या पासला मुदतवाढ देण्याची हजारो प्रवाशांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिचंवड महानगरपालिका हद्दी बाहेरील बस सेवा 17 मार्चपासून बंद झाली आहे. पीएमपीच्या हजारो प्रवाशांच्या पासची लाखो रुपयांची रक्कम पीएमपीकडे जमा असून त्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे दत्तात्रेय फडतरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिचंवड मनपा हद्दीमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून बस सेवा बंद करण्यात आली आहे. 26 मे पासून पिंपरी चिंचवडमध्ये 30 मार्गावर बससेवा सुरु झाली आहे. हजारो प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे पैसचे पैसे अगोदरच भरलेले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना बससेवेचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या हजारो पासधारकांचे लाखो रुपये प्रशासनाकडे जमा आहेत. त्या पासेसला मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. परंतु पीएमपी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

कोरोनामुळे पीएमपीला आतापर्यंत 100 कोटी रुपयाचा फटका बसला असला तरी पासधारकांचे लाखो रुपये प्रशासनाकडे जमा असताना पासधारकांना पासची मुदतवाढ किंवा रिफंड देण्यासंबंधी पीएमपी प्रशासनाने अद्याप काहीही निर्णय घेतला नाही. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरु होईल त्यानुसार पीएमपी बंद कालावधीत झालेल्या गैरसोयीचा दिलासा देण्यासाठी साठ ते नव्वद दिवसांपर्यंत पासधारकांना पासची मुदत वाढ देण्याची व्यवस्था पीएमपी प्रशासनाने करावी, अशी मागणी मंचतर्फे फडतरे यांनी पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे केली आहे.

निवेदनामध्ये, ज्या विद्यार्थ्यांचे लॉकडाऊन काळातील वापर न केलेले पास असतील, अशा विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन बोनाफाईड, ओळखपत्र काढुन नवीन पास काढण्याची सक्ती करण्यात येवु नये, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.