COVID-19 : ‘कोरोना’वर सर्वाधिक प्रभावी ठरलेलं औषध वापरण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना भारत सरकारने रुग्णांवर कमी किंमतीचे स्टेरॉईड डेक्सामेथासोन वापरण्यास परवानगी दिली आहे. मेथिलप्रेडनिसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथसोन वापरले जाणार आहे. मध्यम आणि गंभीर अवस्था असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना हे औषध दिले जाणार आहे. ब्रिटनने डेक्सामेथासोन हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचा दावा केला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी मंजूरी दिली आहे. त्यामुळे डक्सामेथासोनच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने डक्सामेथासोनच्या वापरासंबंधी काही सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार मध्यम आणि गंभीर रुग्णांना तसेच ज्यांना ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे अशांना हे औषध दिले जाणार आहे. डेक्सामेथासोन या औषधावर सर्वप्रथम ब्रिटनमध्ये प्रयोग करण्यात आले होते. ब्रिटनने हे औषध कोरोनावर आतापर्यंतचे सर्वात प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

डेक्सामेथासोनचा वापर करून गंभीर अवस्थेत असलेल्या तीन रुग्णांपैकी एका रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो. असा दावा ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी केला आहे. डेक्सामेथासोन हे औषध संधीवात, दमा सूज अशा आजारांवर वापरले जाते. गेल्या अनेक वर्षापासून या औषधाचा वापर होत आहे. शिवाय डेक्सामेथासोन सर्वसामान्यांना परवडणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही या औषधाच्या वापरला परवानगी मिळाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, गंभीर असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर याचा वापर केला जाऊ शकतो. डेक्सामेथासोनचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे या औषधाचे उत्पादन वाढवून ते वितरित केले जाणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे.