मद्यप्रेमींसाठी खुशखबर ! आजपासून ‘बिअरबार’मधून मद्यविक्री होणार, पण हे आहेत ‘नियम व अटी’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहेत. मद्यविक्रीची दुकाने सुरु करून मद्यप्रेमींना दिलासा दिला आहे. आता मद्यप्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आहे. नागपूरात बिअरबारमधून मद्यविक्रीची डिलिव्हरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूरी मिळाली आहे. राज्य शासनानं केवळ परमिट असलेल्या ग्राहकांना सीलबंद मद्यविक्री करण्याची बिअरबारला परवानगी दिली आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतिक्षा होती.

जिल्हाधिकारी यांनी सोमवारी जिल्ह्यातील बिअरबारला मद्यविक्री परवानगी दिली आहे. मात्र, मंगळवारी या आदेशाची प्रत उशीरा मिळाल्याने आज बुधवारपासून बिअरबारमधून मद्यविक्री होणार आहे. मात्र, बार मालकाला सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये नवीन मद्यसाठा मागवता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, नागपूर शहरात जवळपास 300 तर ग्रामीण भागात 125 बिअर बार आहेत.

लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या बिअर बार मालकांना बार कधी उघडणार याची प्रतिक्षा होती. बहुतांश बिअरबारमध्ये मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे हा साठा एक्स्पायर होण्याची भीती बार मालकांना होती. त्यामुळे वाईन शॉपच्या धर्तीवर बिअरबारमधून पार्सल स्वरुपात मद्यविक्री करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी बार मालकांनी सरकारकडे केली होती.

काय आहेत नियम व अटी
1. ही परवानगी बीअर बारमधील साठा संपेपर्यंत व लॉकडाऊनच्या कालावधीपर्यंत मर्यादीत असेल.
2. ग्रामीण भागातील बीअर बार संचालकांना त्यांच्या काऊंटरवरून ग्राहकांना केवळ सीलबंद पार्सल सुविधा देण्याची परवानगी असेल.
3. मद्यविक्री करताना बार संचालकांना सर्व नियम व अटींचे पालन करावं लागणार आहे.
4. लॉकडाऊनच्या कालावधीत बार मालकाला मद्याचा नवीन साठा मागवता येणार नाही.