Pune News : दुसर्‍यांदा मुलगी झाल्याने विवाहीतेचा छळ, महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील हिंजवडीमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   दुस-यांदा मुलगी झाल्याच्या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पतीने मारहाण केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. 18) हिंजवडी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

योगेंद्र मिनबहाद्दुर साही (वय 24, रा. नारायणनगर, हिंजवडी, मूळ रा. नेपाळ) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची 21 वर्षीय मुलगी तिच्या लग्नानंतर पतीसोबत राहत होती. तिला दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे विवाहितेने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती साही याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.