घृणास्पद ! लहान मुलांसोबत ‘अश्लील’ चाळे, विकृत CCTV कॅमेर्‍यात ‘कैद’

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – भिवंडी शहरातील आदर्श पार्क परिसरातील निवासी इमारतीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लहान मुलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत आपल्या घरी पालकांना याबाबत सांगितल्याने कोणताही दुर्दैवी प्रकार घडला नाही. पालकांनी इमारतीच्या परिसरात सुरक्षेसाठी लावलेले सीसीटीव्ही तपासले असता मुलांची तक्रार खरी निघाली. पालकांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी कमलेश जैन (वय-36) या विकृताला अटक केली आहे.

आदर्श पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील काही लहान मुले इमारत परिसरात कुत्र्यासोबत खेळत होती. त्यावेळी डोक्यावर टोपी घालून एक विकृत त्या ठिकाणी आला. त्याने आपले गुप्तांग बाहेर काढून लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. घरी गेल्यानंतर रात्री झोपताना पालकांनी मुलांचे कपडे बदलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलांनी कपडे बदलण्यास नकार देत अंकल येईल, असे म्हटले. मुलांच्या वक्तव्यामुळे पालक सावध झाले. त्यांनी मुलांना विश्वासात घेऊन विचारले असता हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर पालकांनी या घटनेची खातरजमा करण्यासाठी इमारतीमधील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये विकृतीचे किळसवाणे वर्तन दिसून आले. त्यानंतर पालकांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलसांनी जैन याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीला भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.