युवकाच्या मृत्यूनंतर पोलिसांना कोंडले

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – उमरखेड तालुक्यातील बोरी येथील जुगार आड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शौचास जाणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांनाच कोंडून ठेवल्याने खळबळ उडाली आहे.

संजय बुरकुले (वय ३५ रा. बोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.४) दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरी येथे घडली.

सोमवारी गावातील जुगार आड्ड्यावर पोलीस छापा टाकण्यासाठी गेले होते. पोलिसांना पाहताच जुगारी पसार झाले. याच दरम्यान शौचास जात असलेल्या संजय पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांना संजय हा जुगारी असल्याचा समज झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत संजय गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती ढासळल्याने त्याला किनवटच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी गावकऱ्यांना समजताच त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांनी दोन पोलिसांना खोलीत कोंडून ठेवल्याने तणाव निर्माण झाला होता.