न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! पतीच्या उत्पन्नात पत्नी, मुलांसह आई-वडिलांचाही वाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोणत्याही व्यक्तीचा त्याच्या कमाईवर फक्त त्याची पत्नी आणि मुलांचा हक्क असतो. पण त्यासह त्याच्या वृद्ध आई-वडिलांचाही अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. एका पोटगी प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असताना हा निकाल दिला. याबाबतची सुनावणी तीस हजारी जिल्हा सत्र न्यायालयात झाली.

एका पोटगी प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यावर न्यायाधीश गिरीष कथपालिया यांनी निकाल दिला. महिलेने उत्पन्नासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. पतीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले, की माझे मासिक उत्पन्न 37 हजार रुपये आहे. यातील रकमेतून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलांचा सांभाळ करावा लागतो. त्यातच आई-वडिलांची काळजीही घ्यावी लागते.

दरम्यान, पतीकडून हे प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना याचा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले होते. त्यात अधिकाऱ्यांनी सांगितले, की पतीने सादर केलेली कागदपत्रे योग्य आहेत. त्याच्या आयकर खात्यानुसार त्याचे उत्पन्न 37 हजार रुपये इतके आहे. त्यात आई-वडिलांच्या आजारपणाचा खर्चही तो करतो. या सर्वाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

पत्नीने म्हटले की…

पतीचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तरीही तिला आणि तिच्या मुलांना फक्त 10 हजार रुपये पोटगी दिली जात आहे. पतीवर असलेल्या इतर जबाबदाऱ्यांपेक्षा तिची आणि मुलाची जबाबदारी महत्वाची आहे. त्यामुळे जास्त पोटगी मिळावी, अशी मागणी पत्नीने केली होती. या प्रतिज्ञापत्रानंतर न्यायालयाने यावर महत्वपूर्ण निकाल दिला आहे.