‘त्यानं’ फिल्मी स्टाईलनं चोरला 1300 क्रेडिट कार्डचा ‘डाटा’, अखेर पोलिसांच्या ‘जाळ्यात’ अडकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात बँकेची गोपनीय माहिती चोरून पैसे चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. RBI ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालामधूनही अशा घटना वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अशीच एक घटना जपानमध्ये घडली असून या जिनियस चोराने अत्यंत हुशारीने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दिसून आले. जपानमधील एका कारकुनाने केवळ एकदाच पाहून 1,300 हून अधिक ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा तपशील लक्षात ठेवला आणि सर्व माहिती चोरली. ज्याचा गैरवापर करून ऑनलाइन शॉपिंगही केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटटो शहरातील मॉलमध्ये तपशीलांची नोंद (डेटा एन्ट्री) करण्यासाठी तनिगुची हा व्यक्ती अर्धवेळ (पार्ट टाइम) नोकरी करत असे.

जपानी वृत्तसंस्था जपानटुडे.कॉमच्या रविवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड देऊन पैसे भरले, तेव्हा संशयिताने त्यांच्या खरेदी प्रक्रियेदरम्यान त्यांचा 16-अंकी क्रमांक, नाव, समाप्ती तारीख आणि सुरक्षा कोड लक्षात ठेवला. या गोपनीय माहितीचा वापर करून नंतर त्याने ऑनलाइन शॉपिंग केले.

कोट्टो शहरातील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या 34 वर्षीय कारकुनावर आरोप आहे की त्याने ग्राहकांकडून 16 अंकी क्रेडिट कार्ड ची माहिती चोरून नंतर ऑनलाइन शॉपिंग केले.

असा सापडला आरोपी :
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची स्मरणशक्ती आणि तर्कक्षमता शेरलॉक होम्सच्या पातळी इतकी तल्लख असली तरी क्रेडिट कार्ड माहितीने त्याने 270,000 येन (सुमारे 2500) किंमतीच्या दोन बॅग खरेदी केल्या, ज्यासाठी त्याने आपला खरा पत्ता कंपनीला पाठविला. इथेच त्याची चूक झाली. आपल्या कार्डचा गैरवापर झाल्याचे आढळल्यानंतर नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना आरोपीचा पत्ता ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडून मिळाला. पोलिसांनी थेट तेथे जाऊन त्याला अटक केली. पोलिसांना एक नोटबुक मिळाली आहे, ज्यात त्याने बर्‍याच लोकांची नावे व त्यांच्याशी संबंधित माहिती लिहिलेली आहे. यावरून भविष्यात अशा प्रकारे अजून अनेक लोकांना गंडा घालण्याचे आरोपीचे मनसुबे स्पष्ट होतात.