पाकिस्तानच्या पेशावरमधील मदरशामध्ये बॉम्बस्फोट, 7 मुले ठार आणि 70 जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे, या धमाक्यात सात लोकांचा मृत्यू आणि 70 जण जखमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान पोलिसांनी या स्फोटाची माहिती देताना सांगितले की, पेशावरच्या दिर कॉलनीतील एका मदरशामध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यात सात जणांचा मृत्यू झाला.

पेशावर शहरातील पोलिस अधीक्षक वकार अजीम यांनी सांगितले की, पेशावर शहरातील दिर कॉलनीमध्ये असलेल्या मदरशामध्ये फज्रच्या (सकाळी) नमाजानंतर स्फोट झाला. मदरशाच्या भिंतीजवळ अज्ञात व्यक्तीने स्फोटक वस्तूंनी भरलेली बॅग ठेवली, यात सात मुले ठार झाली आणि 70 जखमी झाले.

खैबर पख्तूनख्वाचे पोलिस प्रमुख सनाउल्ला अब्बासी यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोट घडला तेव्हा सुमारे 40-50 मुले मदरशाच्या आसपास होती. तर सुमारे एक हजार मुले मदरशामध्ये हजर होती. अद्याप कोणीही स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. रुग्णालयाचे अधिकारी मोहम्मद असीम खान यांनी सांगितले की, मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्यांपैकी बहुतेक बॉल बीयरिंगच्या कचाट्यात आले आणि काहीजण जळून खाक झाले.

लेडी रीडिंग हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून या घटनेत 70 लोक जखमी झाले आहेत. जखमींना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा निषेध केला असून जखमीं लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केली.

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी मुलांवरील हल्ल्याचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार कामरान बंगश म्हणाले की, या स्फोटाची कसून चौकशी करण्यात येणार असून दोषींना शिक्षा होईल. ते म्हणाले की, जे दहशत पसरवितात ते आपल्या कार्यात कधीही यशस्वी होणार नाहीत. हा परिसर घेरला गेला असून पोलिस पथक पुरावे गोळा करीत आहेत. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. खैबर पख्तूनख्वाचे आरोग्यमंत्री तैमूर सलीम झागरा यांनी घटनास्थळाला भेट दिली. पीएमएल-एनचे उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी याला “हृदयद्रावक” घटना म्हटले आहे.