बेकायदेशीर ‘वेट मार्केट’मधून येऊ शकते नवीन ‘महामारी’, PETA चा भारताला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात जनावरांसाठी काम करणार्‍या पेटा या स्वयंसेवी संस्थेने भारत सरकारकडे मागणी केली आहे की, कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता देशात सध्या सुरू असलेले वेट मार्केट त्वरित बंद करावे. जर ते बंद केले गेले नाही, तर या बाजारपेठेमुळे भारतात एक नवीन महामारी पसरू शकते, अशी भीती संस्थेने व्यक्त केली आहे.

पीपल्स ऑफ द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पीईटीए) ने भारतात सध्या सुरू असलेल्या वेट मार्केट्सचे व्हिडिओ फुटेज जारी करत म्हटले की, हे बाजार त्वरित बंद केले जावेत.

पेटाने म्हटले आहे की, हे बाजार देशातील विविध भागात बेकायदेशीरपणे चालत आहेत. संस्थेने म्हटले आहे की कुत्र्यांचे मांस विकले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. जे वन्यजीव प्रतिबंध अधिनियम १९७२, प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएलेटी टू अ‍ॅनिमल ऍक्ट १९६० आणि द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट २००६ चे थेट उल्लंघन आहे.

पेटाने सांगितले की दिल्ली, पश्चिम बंगाल, नागालँड आणि मणिपूरमध्येही बाजारपेठ पसरली आहे. सध्या कोविड-१९ महामारी मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. चीनमधील वेट मार्केटमधूनच मनुष्यामध्ये कोरोना विषाणूची लागण झाली होती. चीनमधील असे अनेक रोग डुक्कर व इतर वन्य प्राण्यांमुळे मानवांमध्ये बर्‍याच वेळा पसरले आहेत. म्हणूनच अशा बाजारपेठा तत्काळ प्रभावाने बंद केल्या पाहिजेत.

पेटाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये दिल्लीची गाजीपूर मुर्गा मंडी दाखवली आहे. ज्यात जिवंत खेकडे दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मलांछा मार्केटमध्ये जिवंत ईल्स मासे आणि नागालँडमधील दिमापूरमधील किडे बाजारात कुत्र्याचे मांस विकले जात आहे.

मणिपूरच्या नुते बाजारात माकड, रानडुकर, शाही आणि हरिण यांचे मांस विकताना दिसत आहे. अनेक वन्य प्राण्यांचे मांस मणिपूरच्या चुडाचंदपूर बाजारातही विकले जात आहे. या बाजारपेठेत वन्यजीवांविषयी केलेल्या कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे.

पेटा इंडियाच्या वेगर आउटरीच समन्वयक डॉ. किरण आहुजा यांनी सांगितले की, जर अशाच प्रकारे घाणीने भरलेले हे वेट मार्केट चालू राहिले, तर पुढील व्हायरस इथूनच कुठून तरी एखाद्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो.

डॉ. आहूजा यांनी सांगितले की, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, सार्स आणि आता कोविड-१९ या सर्व महामारी चीनच्या वन्य प्राण्यांच्या वेट मार्केटमधूनच पसरल्या आहेत. यामुळे सर्वाधिक त्रास माणसांनाच झाला आहे. त्यामुळे अशी बाजारपेठ त्वरित बंद करावी. प्राण्यांची हत्या थांबवली पाहिजे.

पेटाने याबाबत भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, पशुसंवर्धन मंत्रालय, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागाला अशी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करत पत्र लिहिले आहे.

नुकतेच नागालँडने आपल्या इथे कुत्र्यांचे मांस बाजार बंद करण्याची घोषणा केली होती. याशिवाय जगात असे बरेच देश आहेत, जिथे कुत्री, माकड आणि मांजरांचे मांस खाल्ले जाते. हे देश म्हणजे चीन, तैवान, दक्षिण कोरिया, फिलीपिन्स, थायलंड, लाओस, व्हिएतनाम आणि कंबोडिया.