शीना बोरा मर्डर केसमधील आरोपी पीटर मुखर्जीला ‘जामीन’, मात्र जेलमधून येऊ शकणार नाही ‘बाहेर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मागील चार वर्षांपासून तुरुंगात असलेल्या पीटर मुखर्जींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या जामीनानंतर सीबीआयने तात्काळ न्यायालयाला स्टे आणण्याची मागणी केली. सीबीआयकडून सांगण्यात आले की प्रकरण अत्यंत गंभीर आहे. न्यायालयाने सीबीआयचे म्हणणे मान्य केले आणि आपल्या निर्णयावर 6 आठवड्यांसाठी स्टे आणला. त्यामुळे जामीन मिळाला असला तरी पीटर मुखर्जी तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही.

या 6 आठवड्यात पीटर स्टे ऑर्डरवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. न्यायालयाने केसच्या सुनावणीदरम्यान सांगितले की केसच्या तपासणी दरम्यान असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत ज्यावरुन स्पष्ट होईल की पीटर मुखर्जी या गुन्ह्यात सहभागी होते.

शीना बोरा हत्याकांडमध्ये पीटर मुखर्जी यांना 19 नोव्हेंबर 2015 साली ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी त्यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी आहे. जस्टिस नितीन सांबरे यांनी पीटर मुखर्जी यांचा जामीन 2 लाख रुपयांच्या गॅरंटीवर मंजूर केला आहे.

जस्टिस सांबरे यांनी आपल्या आदेशात म्हणले की, जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा पीटर मुखर्जी भारतात नव्हते. या केसची सुनावणी सुरु आहे, मागील 4 वर्षांपासून ते तुरुंगात आहेत. नुकतीच त्यांची बायपास सर्जरी झालेली आहे. यासह पीटर मुखर्जी यांना निर्देश दिले आहे की या दरम्यान ते त्यांची मुलगी विधि, मुलगा राहुल मुखर्जी आणि दुसऱ्या साक्षीदारांना संपर्क साधू शकत नाहीत.