वाराणसीतून PM नरेंद्र मोदींच्या निवडणुकीला आव्हान देणारे जवान तेज बहादूर यांची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सुप्रीम कोर्टाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी लोकसभेच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सीमा सुरक्षा दलाचे माजी जवान तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द होण्याच्या प्रकरणात दाखल अपिलावर मंगळवारी निर्णय सुनावला. सुप्रीम कोर्टाने तेज बहादूर यांची याचिका फेटाळली.

चीफ जस्टिस ऑफ इंडिया एस. ए. बोबडे, जस्टिस ए. एस. बोपन्ना आणि जस्टिस वी. रामासुब्रमणीयम यांच्या पीठाने 18 नोव्हेंबरला तेज बहादूर यांच्या अपिलावर सुनावणी केली होती. तेज बहादूर यांनी अलहाबाद हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. हायकोर्टाने तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द करण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दाखल याचिका फेटाळली होती.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तेज बहादूर यांच्या वकिलाने बाजू मांडली की, त्यांच्या अशिलाने अगोदर अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता, नंतर समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. हायकोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी दावा केला की, तेज बहादूर यांची उमेदवारी दुसर्‍या कारणांमुळे फेटाळली गेली होती.

निवडणूक अधिकार्‍याने काय म्हटले होते?

निवडणूक अधिकार्‍याने मागील वर्षी एक मे रोजी तेज बहादूर यांची उमेदवारी नाकारली होती. तेज बहादूर यांना 2017 मध्ये सीमा सुरक्षा दलातून बरखास्त करण्यात आले होते. त्यांनी एका व्हिडिओत आरोप केला होता की, सशस्त्र दलाच्या जवानांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते.

निवडणूक अधिकार्‍याने बहादूर यांची उमेदवारी रद्द करताना म्हटले होते की, त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाद्वारे निर्धारित प्रारूपात हे प्रमाणपत्र जोडलेले नाही की, त्यांना भ्रष्टाचार किंवा शासनासोबत विश्वासघात केल्याच्या कारणामुळे सशस्त्र दलातून बरखास्त केलेले नाही. न्यायालयामध्ये 18 नोव्हेंबरला या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीठाने बहादूर यांच्या वकिलाला म्हटले होते की, तुम्हाला हे प्रमाणपत्र जोडायचे होते. तुम्ही ते जोडले नाही. तुम्ही आम्हाला सांगा की, जेव्हा तुमची उमेदवारी रद्द झाली होती, तुम्ही एका पक्षाचे उमेदवार होतात का.