रेमडेसिवीर साठा आणल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भाजप खासदार अडचणीत, हायकोर्टात याचिका

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन – देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना दिल्लीतून गुप्तपणे खासगी विमानाने रेमडेसिवीरचा साठा आणल्याने अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील अडचणीत आले आहेत. डॉ. विखे पाटील यांनी आणलेल्या रेमडेसिवीरची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. हा साठा जप्त करावा, तसेच कायदेशीर परवाना नसताना रेमडेसिवीर वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती याचिकेत केली आहे. याचिकेवर गुरुवारी (दि. 29) सुनावणी होणार आहे. मात्र, तोपर्यंत संबंधित यंत्रणा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे यासंबंधी कारवाई करू शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

खासदार डॉ. विखे पाटील यांनी दिल्लीतून विशेष विमानाने रेमडेसिवीरचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप केल्याची माहिती त्यांनी सोशल मिडियाद्वारे प्रसारीत केली. रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केले नाही. यातील इंजेक्शन त्यांनी सरकारी दवाखान्याला वाटप केले आहे. कोणताही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ. विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातून रेमडेसिवीर खरेदी केली असावी. या औषधाच्या खात्रीसंबंधी आवश्यक प्रमाणपत्र आहेत का, त्यांचे वितरण कोठे झाले, त्याचा हिशोब आहे का, याची चौकशी करावी. हा साठा सरकारने जप्त करून त्याचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत समन्यायी वाटप व्हावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे व बी. यू. देबडवार यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी होत आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे व अ‍ॅड. राजेश मेवारा काम पाहत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ही फौजदारी याचिका दाखल केली आहे