इंदोरीकर महाराजांविरोधात औरंगाबाद हाय कोर्टात याचिका दाखल; अडचणी वाढण्याची शक्यता

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारे वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेर जिल्हा कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांना कोर्टाने दिलासा दिला होता. आता मात्र इंदोरीकर महाराजांविरोधात औरंगाबाद हाय कोर्टात अंनिसकडून याचिका दाखल करण्यात आलीय. यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इंदोरीकर महाराजांनी पुत्रप्राप्तीबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याचिका दाखल करत इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केलं आहे. अंनिसच्या राज्य सचिव आणि याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या याचिकेवरून आता आठ आठवड्यानंतर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. या याचिकेवरून इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.

या दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी म्हटलं होतं की, स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते असे वादग्रस्त भाष्य त्यांनी केले होते. या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकरांना PCPNDT कायद्यानुसार नोटीस बजावली होती. यावरून इंदोरीकर महाराजांनी दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत स्पष्टीकरण दिले होते.