विकास दुबेचा ‘एन्काऊंटर’ होणार असल्याचा वकिलास यापुर्वीच संशय, सुप्रीम कोर्टात दाखल केली होती याचिका

नवी दिल्ली : कानपुर चकमकीतील मुख्य आरोपी विकास दुबेला गुरूवारी मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक झाली होती. युपी पोलिसांनुसार कानपुरला त्याला परत आणताना युपी एसटीएफने त्याला एन्काऊंटरमध्ये ठार केले. मात्र, एन्काऊंटरनंतर या प्रकरणावरून देशभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. सोबतच विकास दुबेचे घर पाडणे आणि गाड्या तोडण्याच्या आरोपात युपी पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

घनश्याम उपाध्याय नावाच्या वकीलाने गुरुवारी रात्री सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये विकास दुबेच्या एन्काऊंटरची शंका उपस्थित केली होती. याचिकेत म्हटले होते की, मीडिया रिपोर्टनुसार विकास दुबेने मध्य प्रदेशात जाऊन स्वत:ला अटक करून घेतली होती, जेणेकरून त्याचा एन्काऊंटर होऊ नये. अशावेळी युपी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. याचिकेमध्ये सीबीआय तपासाची मागणी केली होती. सोबतच म्हटले आहे की, विकास दुबेचे घर गाड्यांचे नुकसान करणार्‍या युपी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. आता विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर आज या प्रकरणी सुनावणी होऊ शकते.

असे झाले एन्काऊंटर
युपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर विकास दुबेला कानपुरला घेऊन येणार्‍या एसटीएफच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. या गाडीत विकास दुबे सुद्धा होता. या दरम्यान विकास दुबेने एसटीएफच्या पोलीस कर्मचार्‍याचे पिस्तूल हिसकावले आणि पळण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर पोलीस पथकाने विकास दुबेवर फायरिंग केली. या चकमकीत एक गोळी विकासच्या डोक्यात लागली आणि तो गंभीर जखमी झाला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. कानपुर एसपीने त्यांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिला आहे.