सामाजिक बांधिलकी जपणार्‍या रतन टाटांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या; लाखो नेटकर्‍यांचा मागणीला पाठिंबा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात सामाजिक बांधिलकी जपत वेळोवेळी मदतीसाठी पुढे असणारे
टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष असणार्‍या रतन टाटा यांना भारत रत्न देण्यात यावा अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका नेटकर्‍यांनी केली आहे. चेंज डॉट ओराजी या वेबसाईटच्या माध्यमातून केलेल्या या याचिकेला 2 लाख 40 हजारांहून अधिक जणांनी पाठिंबा दिला आहे.

रतन टाटा हे परोपकार आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी अनेक संशोधनांसाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी मदत केली आहे. दीड आठवड्यापूर्वी करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये टाटा ग्रुप्सच्या मदतीने उभारण्यात आलेल्या संशोधन संस्थांची यादीही देण्यात आली आहे. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने देशामधील कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी 1 हजार 500 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली होती. देशामधील कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टाटा ग्रुपच्या कंपन्या शक्य ती मदत करतील असे टाटा यांनी सांगितले होते.

टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा मदत केली आहे. सध्याचे संकटात देशाला मदतीची गरज आहे, असेही त्यांनी ट्वीट केले होते. कोरोनाशी लढणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) निर्माण करणे, रुग्णांवर उपचार करण्यासाठी श्वसनप्रणाली निर्माण करणे, दरडोई चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी टेस्टींग किटची निर्मिती करणे, संक्रमित रूग्णांसाठी मॉड्यूलर उपचार सुविधा उभारणे, आरोग्य कर्मचारी आणि सामान्यांपर्यंत कोरोनासंदर्भातील जनजागृती करुन त्याबद्दलचे व्यवस्थापन आणि प्रशिक्षण देणे अशा कामांसाठी पैसे वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याबरोबर चेंज डॉट ओआरजीवर टाटांसंदर्भातील जवळजवळ डझनभर याचिका असल्याचे दिसून येते.