पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मिळू शकतो दिलासा ! अनेक पर्यायांवर होत आहे विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. सीएनबीसी-आवाज या चॅनलच्या वृत्तानुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी एक्साइज ड्यूटीत कपातीची मागणी केली आहे. गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोल प्रति लीटर 23 पैशांनी वाढून 84.20 रुपयांवर गेले तर डिझेल 26 पैशांनी वाढून 74.38 रुपये प्रति लीटरवर पोहचले. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार्‍या वाढीमुळे सामान्य माणून मेटाकुटीला आहे. शिवाय, याचा थेट परिणाम रोजच्या वापरांच्या वस्तूंवर होत असल्याने महागाई वाढली आहे.

इतके रुपये होऊ शकतात कमी

पेट्रोलियम मंत्रालयाने वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीपासून दिलासा देण्याची शिफारस केली आहे. यासाठी एक्साइज ड्यूटीमध्ये कपातीची मागणी केली गेली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोविडच्या दरम्यान जेवढी एक्साइज ड्यूटी वाढवण्यात आली आहे, जर त्यापैकी अर्धी कपात केली गेली तर किंमत 5 रुपये प्रति लीटरने कमी होऊ शकते. परंतु, याचा पूर्ण फायदा पोहचवण्यासाठी राज्यांनी सुद्धा सहकार्य करत व्हॅटमध्ये कपात केली पाहिजे.

या पर्यायांवर होत आहे विचार

राज्यांना वॅट कमी करण्याचे आवाहन केले जाऊ शकते. तेल कंपन्यांना काही भार उचलण्यास सांगितले जाऊ शकते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या तेलाचे दर वेगाने वाढत आहेत. ब्रेंटचे दर फेब्रुवारीनंतर सर्वात उच्च स्तरावर आहेत. डोमेस्टिक मार्केटमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा वाढले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल दरात 21 ते 23 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 ते 29 पैशांची वाढ केली आहे.