पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 26 रुपयांची वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे लोक सध्या कोरोना व्यतिरिक्त महागाईच्या मुद्द्यांशी झगडत आहेत. तिथे खाण्या- पिण्याच्या वस्तूही महागल्या आहेत. अशा परिस्थितीत इम्रान खान सरकारने लोकांना आणखी त्रास देण्यास सुरुवात केली आहे, आंतरराष्ट्रीय किंमतींचा हवाला देत शुक्रवारी तेलाच्या किमती वाढवल्या. पाकिस्तान सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत प्रतिलिटर सुमारे 26 रुपयांची वाढ केली.

पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ
वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार पेट्रोल (मोटार स्पिरीट) ची किंमत सध्याच्या लिटरमागे 74.52 रुपयांवरून 100.10 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे, म्हणजे 25.58 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर हायस्पीड डिझेलची किंमत (एचएसडी) देखील प्रति लिटर 21.31 रुपये वाढविली आहे, म्हणजेच 101.46 रुपये प्रतिलिटर झाली आहे. पूर्वी हीच किंमत प्रतिलिटर 80.15 रुपये होती. रॉकेलच्या किंमतींबद्दल बोलायचे झाल्यास यात प्रति लिटर 23.50 रुपयांनी वाढ केली असून ते प्रति लिटर 59.06 रुपयांवर गेले आहे. यापूर्वी रॉकेलची किंमत प्रति लीटर 36.56 रुपये होती.

अचानक वाढल्या किमती
अर्थविभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक बाजारपेठेत तेलाच्या वाढत्या किंमती लक्षात घेता पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन किंमती 26 जून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत. पाकिस्तानमध्ये तेलाचे दर अशा वेळी वाढविण्यात आले आहेत जेव्हा देशाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. नवीन किंमती सहसा महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केल्या जातात, परंतु यावेळी किंमती अचानक वाढविण्यात आल्या आहेत ज्यामुळे लोकही चिंतीत आहेत.

भारतातही वाढल्या किंमती
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत दोन वर्षांत पहिल्यांदाच 80 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. आतापर्यंत पेट्रोलच्या किमती प्रतिलिटर 10 रुपयांपर्यंत महागल्या आहेत, तर डिझेलच्या किंमतीही दहा रुपयांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.