Pune News : पुण्यात सलग 3 दिवस पेट्रोल नव्वदीपार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. त्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सातत्य कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पाच दिवसांनंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) वाढवले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढत असून पुण्यात बुधवारी (दि. 13) पेट्रोलचे दर 90.75 रुपये प्रति लीटर आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 91 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने वाहन चालकांना त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

तेल कंपन्यांनी गेली 29 दिवस इंधनाच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नव्हती. त्यानंतर 6 आणि 7 जानेवारीला दर वाढले होते. या दोन दिवसात पेट्रोलचे भाव 49 पैसे प्रति लीटर वाढले होते, तर डिझेल 51 पैसे प्रति लीटरने महागले होते. बुधवारी मुंबईत पेट्रोल 91.07 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 81.34 रुपये प्रति लीटर आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर 25 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. या वाढीनंतर पेट्रोल 84.45 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 74.63 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर पुण्यात पेट्रोल दरात वाढ झाली आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये बुधवारी पेट्रोलचे दर 90.75 रुपये प्रति लीटर तर डिझेल 79.80 रुपये प्रति लीटर आहेत.

असे तपासा पेट्रोल डिझेलचे नवे दर
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती घेता येऊ शकते. तसेच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP स्पेस पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.