सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे  पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सोमवार पासून सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. या पाच दिवसात दिल्लीमध्ये पेट्रोल 58 पैसे प्रति लीटरने महागले आहे. तर डीझेलचे दर 49 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढीवर पूर्णविराम लागला आहे. असे असले तरीही ब्रंट क्रूड आताही 66 डॉलर प्रति बॅरलपेक्षा वर आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडच्या दरात चार डॉलर प्रति बॅरलने उसळी आली होती. मुंबईमध्ये 76.54 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. काल ही किंमत 76.39 रुपये इतके होते.

तेल मार्केटींग कंपन्यांनी सोमवारी पुन्हा दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 15 पैशांनी वाढवले आहेत. चेन्नईमध्ये 16 पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली आहे. डीझेलच्या किंमती दिल्ली आणि कोलकात्यामध्ये 13 पैशांनी तर मुंबई आणि चेन्नईमध्ये 14 पैसे लीटर वाढल्या आहेत. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल क्रमश: 70.91 रुपये, 73.01 रुपये, 76.54 रुपये आणि 73.61 रुपये प्रती लीटर झाले आहे. चार महानगरांमध्ये डीझेलच्या किंमती क्रमश: 66.11 रुपये आणि 67.89 रुपये प्रति लीटर, 69.23 रुपये आणि 69.84 प्रति लीटर झाल्या आहेत.

तेल निर्यात कंपन्यांचा समूह ‘ओपेक’ अर्थात ‘ऑर्गेनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कन्ट्रीज’द्वारा करण्यात येणाऱ्या तेल पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे. ‘ओपेक’चा सर्वात मोठा तेल उत्पादक देश सौदी अरेबियाने मार्चपर्यंत आपल्या उत्पादनात ५ लाख बॅरेल प्रतिदिन कपात करणार असल्याचे घोषित केले आहे. रशियानेही आपल्या उत्पादनात मोठ्या कपातीची तयारी केली आहे. या कपातीचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होणार असून त्यामुळे भारतीय बाजारात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.