मुख्याधिकार्‍यांसमक्ष एकाने अंगावर ओतून घेतले पेट्रोल; काही काळ गोंधळाची स्थिती

परतवाडा : पोलिसनामा ऑनलाईन – अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत जयस्तंभ -दुरानी चौक ते गुजरीबाजार दरम्यानच्या रस्ता बांधकामामध्ये मुख्याधिकारी, नगरसेवक व बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या समोर बुधवारी एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडला. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झालीय. याबाबत मुख्याधिकार्‍यांशी शाब्दिक खडाजंगी झालीय. अखेर पोलिसांच्या निर्देशानंतर तो इसम पोलीस ठाण्यात पोहचलाय.

विशेष रस्ते विकास निधीअंतर्गत 2-4 दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम कंत्राटदाराने सुरू केलंय. यासाठी त्याने रस्त्या मोकळा करण्यासाठी साईडला असलेले अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण काढले आहे. दुरानी चौकातील एका पेट्रोलपंपजवळ गजराजसह अधिकारी पोहचलेत. तेथे पेट्रोलपंपशी संबंधित एका इसमाने गजराज न चालविण्याबाबत मुख्याधिकार्‍यांना विनंती केलीय.

पेट्रोलपंपलगत रस्त्यावर डांबर नको. हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे तेथे पेव्हींग ब्लॉक बसवावेत, अशी आग्रही मागणी मुख्याधिकार्‍यांपुढे ठेवली. यादरम्यान शाब्दिक चकमकही घडली. नगरपालिकेने टाकलेली चुण्याची लाईन बघून पेट्रोलची बाटली त्या इसमाने जवळ घेतली. त्यातील काही पेट्रोल अंगावरसुद्धा घेतले. या संपूर्ण घटनाक्रमाचे नगरपरिषदेकडून व्हिडीओ शुटींगही केलंय.

याअगोदर मुख्याधिकारी गणेश देशमुख आणि एसडीओ अरुण डोंगरे हे असताना याच दुरानी चौकातील अतिक्रमण काढण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला होता. तेव्हा नगरपरिषदेचे काही कर्मचारी गंभीर जखमीही झाले होते. संबंधितांनी हे प्रकरण न्यायालयात पोहचविले. यात न्यायालयाने लाखो रुपयांची पेनॉल्टी नगरपरिषदेवर ठोकली होती.

रस्त्याचे काम करताना रस्त्याचा मध्य काढावा. रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने सारखे अंतर घेऊन मग नगरपरिषदेने गजराज फिरवावा. अतिक्रमण काढताना कुठलाही भेदभाव करू नये. सरसकट एका लाईनमध्ये अतिक्रमण काढावे, अशी न्याय्य मागणी नागरिकांनी केलीय.

पेट्रोलपंपाशी संबंधित व्यक्तीने शाब्दिक वाद घालत अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला. संबंधितास असलेले आवश्यक दस्तऐवज सादर करण्यास सुचविले आहे. या घटनेच्या अनुषंगाने लिखित तक्रार केलेली नाही. दस्तऐवज बघून पुढील कारवाई निश्चित करू, असे अचलपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी सांगितले आहे.